आजी

।। *आजी* ।।



मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते...

उबदार स्पर्शातून माझ्याशी खूप काही बोलते
आजीच्या सूती पातळाची गोधडी
गर्भ रेशमी ऊब देऊन जाते
मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते...

इवल्या कपाळावर मेणानं टप्पोरं कुंकू लावलेली,
करड्या शुभ्र केसांचा सुपारी एवढा अंबाडा घातलेली
अवघ्या देही सुरकुतलेली पण चेहऱ्यावर समाधानचं ऐश्वर्य ल्यायलेली माझी आजी
मला पांच्याहात्तरितही तेवढीच कणखर भासते
मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते...

ओथंबलेल्या आवाजात आजी
माझी खुशाली विचारते
डोक्यावरून पाठीवरून
मायेनं हात फिरवते
हट्ट न करताही सगळ्या गोष्टी ऐकवते
त्याच सुरात त्याच लयीत गोड अंगाई गाते
मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते...

आजी उघडते एक गाठोडे, मला हळूच विचारते
कमी पडतंय का गं काही?? म्हणून पुन्हा देऊ करते
त्यातून बाहेर काढते एक एक शिदोरी,
संस्काराची, धारिष्ट्याची, आदराची, अदबीची, धीराची, नी संयमाची..
आहे तरीही असू देत गं..जास्तीच लागत आजकाल सगळं म्हणते..
मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते...

गोधडीचाच्या उबदार स्पर्शातून आजी मला नेहमीच भेटते,
पुन्हा लहान पणीचा निखळ आनंद देते
मोठ होत राहण्याची उमेद देते
चढ उतारांचे धडे देते
आवरण जुने असले तरी आत ऊब साठवण्याची शिकवण देते
मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते...
मऊ गोधडी बघितली की मला आजी आठवते...
 


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*