चाहूल मृत्युची

*चाहूल मृत्यूची*


रात्रीच्या वेळी लागे चाहूल दूर कोणाची
करकरत्या दारावरती थडथडा थाप मृत्यूची
वाहते मनातुन भीती, शंका वाटे सगळ्याची
पालखी चालली वाटे भयकारक अशुभ कुणाची

अंगणात पाउल वाजे चुरचुरे शुष्क पाचोळा
सळसळता पिंपळ गाजे, पोटात उठे मग गोळा
हृदयात धडधडे भारी पाहून भयाच्या खेळा
भीतीने होतो वाटे हृदयाचा चोळामोळा

खळखळते पाणी कोठे, कोठे सळसळ सर्पाची
खदखदती हसते आहे सावली इथे अशुभाची
वाजतात दातावरती कटकटा दात कवटीचे
आवाज घशातुन निघती खरखरते गुदमरल्याचे

हाकामारीच्या हाका मृत्यूला म्हणती ये रे
चिरफळ्या होत डोक्याच्या, ये घोंगावत मग वारे
दूरचे रान भरलेले घुबडांच्या घुत्काराने
चांदणे वाटते आहे भरलेले पूर्ण विषाने

या असल्या अर्ध्या रात्री डोळ्यावर झापड येते
चाहूल लागता हलकी का मनात भीती भरते
ही रात्र खुणा सांगतसे सैतानी अस्तित्वाच्या
ना याव्या असल्या रात्री जगण्यामध्ये कोणाच्या


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*