सात्विक संताप  

मंदिरात आहेस तर , जाग जरा देवा ,

गाभाऱ्याला लागू देरे , बाहेरची हवा ..... ।

डोळे मिटून घेशी जणू ,पाहुनी पतन  ....

तुवा दिले माणसाला पृथ्वीचे वतन .... ।

विध्वंसाचा ठेका ,जगी माणूस मातावा  ....

त्याचे भय न्यारे , तुवा  गाभारा गाठावा ...|

उन्हामध्ये ताठल्या गा , भाविकांच्या रांगा ....

कोरडेला कंठ , घाम धावे चहू अंगा  .... ।

तुझ्या वाटे , भक्तीचाही व्यापार पाहावा ...

तरी तुला आम्ही भक्त वत्सल म्हणावा ....|

चराचरी व्यापलेला असशी म्हणती ...

नित्य  येते तुझ्या नसण्याची रे प्रचिती ....|

अमानुष खेळ जगी ,चालला पाहावा ....

सांग देवा तुला ,कुण्या राऊळी शोधावा ....|

लेकीबाळी मरतात , वासनेच्या खेळी ...

सांग कुठे असतोस , देवा तू त्या वेळी ....

अणूरेणूतून तुझ्या असण्याच्या ओळी

वाटे मला , कस तुझा पणाला लागावा  .... ।

प्राक्तनाचे , प्रारब्धाचे , पाठ सारे धडे ...

निष्पाप जीवांचा बळी , यातनांचे मढे ....

माणसाला दिले मन बुद्धी ,  तू तोकडे ....

माणसाचा लगाम तू पुन्हा हाती घ्यावा ..... ।

कोटी कोटी रूपातून , प्रकट होतोसी ....

कोटी कोटी मनातून का न तू राहसी ....

मनातला देव कधी दानव होताची ...

मनातला दानव तू  निर्दाळून द्यावा ..... ।

रोज रोज काय मने ,रक्ताळली व्हावी ...

रोज रोज काय नवी हाक मी घालावी ....

तुझ्या जगताची तुला तमाच नसावी ...

कधीतरी तुझा जीव कासावीस व्हावा ....|

ठाम इथे उभी मीही ,तुझ्या पायरीशी ...

नाही येणार आत ,तुवा यावे रे दाराशी ...

भक्ती लागो पणा , मनी दाटली असोशी   ....

मला नको , न्याय  साऱ्या जगाला दे देवा .... ।



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*