गाभुळलेल्या चंद्रवनात

*‘गाभुळलेल्या चंद्रबनात'*



लोककलेचे टिपूर चांदणे... ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’ ही विश्वास पाटील यांची
कादंबरी आहे. या कादंबरीतून त्यांना सामान्य वाचकांना फारसे परिचित नसलेले
तमाशाचे जग उभे केले आहे. केवळ एका अपरिचित जगाचे प्रत्ययकारी चित्रण एवढेच या
कादंबरीचे सामर्थ्य नाही, तर त्यातील सामाजिक संदेश फार महत्त्वाचा आहे. तमाशा
फडातील आपसातील हेवेदावे, चढाओढी, राजकारण या सगळ्यांचा तपशील अत्यंत
सहृदयतेने या कादंबरीत दिलेला आहे. तमाशा म्हणजे काही तरी अश्लील, गावंढळ ही
समजूत उखडून टाकली आहे. तमाशातही प्रभावी नाट्य उभे करण्यासाठी, तंत्रज्ञानाचा
उपयोग करून घेतला जातो, असे ही कादंबरी सांगते. या कादंबरीचे दुसरे महत्त्वाचे
वैशिष्ट्य म्हणजे, यातील प्रभावी व्यक्तिचित्रणे. ‘तुका चालला वैकुंठाला’ या
वगामध्ये तुकाराम महाराज उभे करणारे कलावंत बाकेराव, नंतर तीच भूमिका करणारा
युवराज पाटणे, औरंगजेबाची भूमिका ताकदीने करणारा इस्माइल ड्रायव्हर, हुबेहूब
वीरश्रीयुक्त छत्रपती संभाजी महाराज रंगवणारा युवराज, त्यामुळे ‘असा झुंजला
महाराष्ट्र माझा’ या वगनाट्याला आलेली रंगत, तुकारामांना मोहविण्यासाठी
मुद्दाम पाठवलेल्या मोहिनीची भूमिका, लावण्यवती रंगकली यांची व्यक्तिचित्रणे
अत्यंत जिवंत झालेली आहेत. त्याचप्रमाणे बाकेरावाचे फडातील पार्टनर असलेले आणि
त्याला हिशंबात फसवणारे गगनआप्पा, त्यांचा चेला चारूस्वामी, रंगकलीची
जिवाभावाची मैत्रीण छबू, सांगेल ती भूमिका साजरी करणारा रामकृष्ण, या काहीशा
दुय्यम पात्रांची व्यक्तिचित्रणेही बहारदार झालेली आहेत. या कादंबरीच्या
कथानकात अनपेक्षित वळणे-वाकणे आहेत आणि त्यातून विलक्षण नाट्य उभे राहिले आहे.
बाकेरावचे वडील पोलीस इन्स्पेक्टर असतात आणि बाकेरावच्या स्त्री-भूमिकेवर लंपट
होऊन त्याच्याशी अंगसंगाची मागणी करतात. प्रत्यक्षात बाकेरावच्या पुरुषत्वाची
ओळख पटल्यावर, ते त्याच्या थोबाडीत मारतात. त्यातून बाकेराव वडिलांचा द्वेष
करू लागतो आणि कथनकाला एक तिढा पडतो. स्त्री भुमिकेत काम करणारे गगनअप्पा
समलैंगिक असतात; पण तरीही रंगकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतात.
तमाशाच्या बसवर डाकू हल्ला करतात. त्यांच्याशी लढताना बाकेराव अपंग बनतो आणि
रामकृष्णाचे डोके फुटते. रंगकली आणि युवराजकडून नको ते पाप घडते.
पश्चात्तापाने पोळलेला युवराज आणि बाकेरावच्या तिरस्कारास पात्र झालेली रंगकली
फड सोडून गायब होतात. कथानकात नाट्य भरत राहते. ही कादंबरी माणसाला भोगावे
लागणारे कष्ट आणि यातना, त्यांचे अपेक्षाभंग यांचा एक फार विशाल पट उभा करते.
त्यातून सहनशीलतेचा आणि दु:ख गिळून जीवन साजरे करण्याचा एक फार मोठा संदेश
जातो. कधीकधी जीवन साजरे करण्यात काही पात्रांना अपयशही येते, पण त्यातूनही
दु:खाची अनिवार्यता अधोरेखित होते. दु:खाला सामोरे जाण्याच्या विविध तऱ्हा ही
कादंबरी दाखवते, त्यातून मानवी जीवन आणि दु:ख यांचा नाट्यमय संघर्ष उभा राहतो
आणि कादंबरी एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. कादंबरीकारची निवेदनशैली अत्यंत
प्रवाही आहे. वर्णने बहारदार आहेत. भाषा वास्तवातील आहे. कादंबरीचा शेवट चटका
लावणारा आहे. एकंदरीत या कादंबरीने विश्वास पाटील यांच्या शिरपेचात आणखी एक
मानाचा तुरा खोवला आहे.




सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठाचे छायाचित्र



सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.