आयुष्य शिखराकडे घेऊन जाणारे पुस्तक

आयुष्य शिखराकडे घेऊन जाणारे पुस्तक

        ' स्वप्न बघा! स्वप्न जगा....!' हे नावीन्य प्रकाशनाचे प्रा. प्रवीण दवणे लिखित नवीन पुस्तक निराशेच्या वातावरणात आशेचा दिवा यावा तसे नुकतेच हाती आले.पुस्तक वाचताना अंतर्मन तेजोमय होऊन पुढील आयुष्याच्या वाटा प्रकाशमान होतील याची खात्रीच पटू लागली. पुस्तकातीलच वाक्य घेऊन सांगायचं झालं तर - _' बाह्य दिवे तेलातुपाने उजळता येतात, ते काही वेळाने मंदावतात; पण जाणिवेचा, संवेदनांचा दीप अभंग सुख घेऊन येतो.'    
 रोजचे प्रश्न त्याची उत्तरे शोधताना सामान्यांची  हतबलता यात
  मनुष्य जीवन अत्यंत कठिण काळातून जात आहे. निराश व उदास मनःस्थितीला नवसंजीवनी मिळणे हे फार गरजेचे होऊन बसले होते. आणि अशी एक नवसंजीवनी सिद्धहस्त लेखक प्रा. प्रवीण दवणे यांच्या रुपाने सापडली. प्रस्तुत पुस्तकात करोना काळात टाळेबंदीमध्ये लेखकाने राबवलेले पन्नास वेबिनार सेशन्स आणि त्यांतून मिळालेल्या अनुभवांतून मनोवेधक असे नक्षत्ररुपी विचार मांडले आहेत. या विचारधनांचा आपल्या बुद्धीवर असा अभिषेक होतो की त्यामुळे मन प्रफुल्लित होऊन जाते. समाजाचा वैचारिक विकास करणे व तरुण पिढीचे जीवन कसदार होण्यासाठी त्यांच्यात कोणते बदल घडवून आणायला हवेत याचे बहुमोल मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे. 
      तुम्हाला प्रश्न पडला असेल असं काय वेगळं आहे बुवा या पुस्तकात ? आजकाल पुस्तकांतून, बातम्यांमधून, आंतरजाल (इंटरनेट) मधून बाह्य जगाबद्दलची भरपूर माहिती आपल्याला मिळते व आपणही शोधत असतो. पण बाहेरचं जग शोधण्याच्या नादात आपला 'स्व' चा शोध म्हणजेच अंतर्शोध करायचे राहूनच जाते. प्रस्तुत पुस्तक हे आपल्याला अंतर्शोध करायला भाग पाडते. पुस्तक वाचल्यावर आयुष्य घडवण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचे नेमके अन् तेही रसाळ शब्दांत मार्गदर्शन मिळते.
      पुस्तकात असणारे वेगवेगळ्या विषयांवरील लेख व त्याला जोडून असणारे विचारांचे सुंदर अलंकार यामुळे मराठी साहित्याच्या श्रीमंतीत भर पडली आहे. लेखकाने तरुणांसोबत केलेला संवाद वाचून विशेष आनंद होतो. कधी गप्पांच्या माध्यमातून तर कधी मुलाखतीच्या निमित्ताने साधलेल्या संवादामुळे तरुणांना भेडसावणा-या गंभीर प्रश्नांची माहिती याठिकाणी मिळते. ते वाचून तरुण पिढी किती बुद्धिमान व वैचारिक आहे हेही कळते. प्रस्तुत पुस्तकातून लेखकाने आपल्या अनुभवांना, विद्वत्तेला चिंतनाशी गुंफून मार्गदर्शनाचे देखणं तोरण बांधले आहे. त्यातून जसंजसं आत जावू तसतसं समाजाचा आणि विशेषतः किशोरवयीन व तरुण मुलांचे कर्तृत्व त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात दरवळल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती वाटायला लागते.आणखी एका गोष्टीकडे लेखक आपले लक्ष वेधतात ते म्हणजे पालक-शिक्षक वर्गाचे नेमकं काय चुकतंय याकडे ! उद्भवणा-या अनेक समस्यांच्या मुळाशी जाऊन लेखकाने जो निष्कर्ष काढलाय तो वाचून पालक-शिक्षक पिढीवर किती मोठी जबाबदारी आहे हे पुस्तकातील एका वाक्यातून अधोरेखित केले आहे— _कृत्रिमतेच्या अतिआहारी गेलेल्या समाजाला प्रखर वास्तवाचे भान देणे ; आयुष्याच्या मूलभूत प्रश्नांकडे पाहाण्याचे आणि नंतर ते सोडवण्याचे सामर्थ्य देणे हे जागरूक पालक-शिक्षक पिढीचे राष्ट्रीय कार्य आहे._ 

      पुस्तकातील एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे लेखकाने समाजातील प्रत्येक घटकाचे— मग तो तरुण असो, पालक असोत, शिक्षक असोत किंवा राजकारणी असोत— मित्र होऊन मायेने समुपदेशन केलं आहे. समाज व कुटुंबव्यवस्थेविषयी लेखकाची काही निरीक्षणे झोप उडवणारी आहेत ! ती वाचून आपण वेळीच जागं होणं फार गरजेचे आहे असं कळकळीनं वाटतं. इतक्या उच्च दर्जाचे व वेगवेगळ्या पद्धतीने केलेले अमूल्य मार्गदर्शन हे तरुणांसाठी वाघिणीच्या दुधासारखे आहे. लेखकाने ज्या पोटतिडकीने सांगितले आहे त्यातून वर्तमान पिढीचे आयुष्य शिखराकडे जावे हि तळमळ जाणवते. पालकांनी जर आपल्या पाल्यांना (किशोरवयीन व तरुण) हे पुस्तक दिले व त्यांनी जर मनःपूर्वक वाचून सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणल्या तर निर्माण झालेल्या अनेक समस्यांचे (आळस, डिप्रेशन, तणाव, उदासीनता, नकारात्मक दृष्टिकोन) निश्चित निराकरण होईल. 
      समाजातील प्रत्येक घटकाला मार्गदर्शन करताना त्यांनी किती मौलिक विचारधन दिलय पहा. संवादाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात— _सर्व गप्पाच यंत्राने केल्या तर, मनाचा झरा, जो शब्दानं बोट धरुन वाहतो, तो बंद होईल आणि व्यक्तच न होण्यामुळे माणूस एकाकी होतो. म्हणून जिवलग मित्र म्हणून सांगत आहे, कधी राग, कधी प्रेम, कधी आनंद, कधी निराशा, दाटून आली की बोलून मोकळे व्हा. संवादाने मने जोडण्याची किमया घडते._
तर करिअर निवडणे हे वाचनावर कसे अवलंबून आहे, हे सांगताना ते म्हणतात— _'स्वत:ला कोण व्हायचंय ते आधीच ठरवू नका, ते ठरवण्याची मुळी तुमच्या मनाची तयारीच झालेली नाही, स्वयंपाकघरातील डब्यात कुठले धान्यच नसेल, तर पुलाव करु की, पुरणपोळी करु? हे ठरवण्याला अर्थ तरी कुठे उरतो? आधी डब्यात धान्य तर भरा, पदार्थ नंतर ठरवता येईल. सर्व प्रकारचे विविध वाचून त्या वाचनातून, चिंतनातून, मननातून आपोआप ठरत जाईल, तुम्ही कोण होणार ते! आपल्या पुढील पाऊलवाटांची निवड करण्यासाठी आधी चालता तर यायला पाहिजे. मनाच्या पायाची शक्ती बळकट करा. पाऊलवाटा आपोआपच तुम्हाला राजपथाकडे घेऊन जातील.'_
      
      पुस्तकातील भाषा फार आकर्षक व मनावर गारुड करणारी आहे. आपल्याशी जणू सरस्वतीच बोलतेय असे वाटते. विचारही सुंदर आणि भाषाही सुंदर ! सोन्याच्या हारात मोती असावेत तसे ! थोडक्यात मन गुंतवून ठेवणा-या लेखनशैलीमुळे पुस्तक हातातून ठेवू वाटत नाही. ' स्वप्न बघा ! स्वप्न जगा...' पुस्तक म्हणजे एक वैचारिक बाग आहे आणि त्यातील प्रत्येक लेखातून सकारात्मक विचारांचा सुगंध दरवळतो व त्यामुळे मनात ऊर्जा संचारते. जणू भाषा, विचार आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा देखणा त्रिवेणी संगमच! 'टेक्नोसेव्ही, छे टेक्नोस्लेव्ही' हा लेख वाचताना लेखकाच्या महानतेचे व विद्वत्तेचे दर्शन घडते. हा लेख म्हणजे जणू एका वैज्ञानिकाने आपल्या तार्किक दृष्टीकोनास हृदयाची जोड देऊन लिहिले आहे असं वाटतं. यात ऋषीमुनी व विज्ञानमुनींच्या विचारांचा सुंदर संगम साधला आहे.
       पुस्तकाच्या भाग २ म्हणजे उत्तरार्धात समर्थ रामदास स्वामींचे तरुणांसाठी व प्रौढांसाठी दिलेले अतिशय सोप्या भाषेतले बोध पुस्तकाचे शिखर ठरतात.थोडक्यात काय तर ' स्वप्न बघा! स्वप्न जगा ' या पुस्तकात समुद्राची खोलीही आहे व शिखराची उंचीही आहे. एकाच वेळी वाचकांना दोन्हींचा प्रत्यय येईल. प्रस्तुत पुस्तकातून केलेले मार्गदर्शन आचरणात आणले तर कोणत्याही मुलाला कर्तृत्वाच्या शिखरावर जाता येईल व ती 'माणूस' म्हणून अंतर्बाह्य घडतील. ज्याला आयुष्यात ध्रुवतारा व्हायचे आहे त्याला हे पुस्तक त्या दिशेने घेऊन जाईल यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून द्यायलाच हवे असे हे पुस्तक आहे. पुस्तकाचा एकंदरीत सर्व बाजूंनी विचार केल्यास असे निदर्शनास येते की समाज जीवनातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर चिंतन केलेल्या एका समाज वैज्ञानिकाने लिहिलेले हे पुस्तक आहे.



सोबत पुस्तकांचे छायाचित्र



सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.