मालगुडी डेज आता मराठीमध्ये!


मालगुडी डेज आता मराठीमध्ये!


बालपणाचा काळ सुखाचा!
मालगुडी डे'च शिर्षक वाचताच आपल्याला आठवली का हो ती चिरपरिचित धून...
"ता ना ना ता ना ना ना ना"

आज जे चाळीस पन्नाशीच्या आतील आहेत त्या सर्वांना मालगुडी डेज नाव वाचता क्षणी त्या मालिकेची धून आठवली असेल! किती साधी आणि सरळ मालिका वाटेल आज जर पुन्हा पहिली तर! पण किती मधुर! वरण भात आणि वरून साजूक तूप! आहे साधे पण तृप्त करणारे! 

आर के नारायण यांचे मालगुडी डेज ही असेच!दक्षिण भारतातील स्वभाव वैशिष्ट्यं भरून असलेल्या माणसांच्या भवती फिरणाऱ्या या लघुकथा आहेत.

लेखक म्हणतो," जेंव्हा एखादी व्यक्ती समस्येतून जाते तेथे मला माझी कथा सापडते!"

या पुस्तकातील सर्व कथांमधील प्रमुख पात्र कोणत्यातरी समस्येतून जात आहेत.त्या नंतर सुटतात! त्या ज्या पद्धतीतून सुटतात त्याची मांडणी लेखकाने फारच हृदयस्पर्शी केलेली आहे.

समस्या फार गंभीर आहेत असे नाही. नायकासाठी त्या गंभीर असू शकतील पण वाचकाला त्यातून आनंद मिळतो.त्या समस्येतून निर्माण होणारा विनोद फारच सुंदर! एका अतिशय गरीब व्यक्तीला जत्रेत रोड रोलर ची लॉटरी लागते....आता काळ बदलला आहे.पण त्या काळी ही लागलेली लॉटरी किती त्रास देते हे वाचण्यात फारच मौज येते.

कथा गतिमान आहेत.नात्यांची आणि आपलेपणाची जोड आहे.भावना ओल्या आहेत...अनेक कथांच्या शेवटी आपली ही नेत्र ओलावताना अनुभवायला येतील!

चुकलेले टपाल:
 या कथेतील पोस्टमन हा चक्क दुसऱ्यांची पत्र वाचतो.लोकांना मनीऑर्डर च्या पैशांचे काय करणार म्हणून विचारण्याची त्याची लगट आहे...कहर तर तो तेंव्हा करतो जेंव्हा मृत्यूच्या बातमीचे पत्र आणि तार दोन्ही लपवून ठेवतो....नोकरी जाईल हे माहीत असूनही तो असे करतो...वाचून झाले की कळते अरे आपले डोळे पाणावले आहेत! नेत्रकडा ओलावल्या आहेत! ही कथा पुस्तकातून वाचली पाहिजे.म्हणून मी परिचयात तिचा उल्लेख मात्र केला आहे.ही कथा वाचताना उगीच वाटायला लागते....हा पोस्टमन पु.ल. देशपांडे यांच्या "नारायण" चां चुलत भाऊ!(व्यक्ती आणि वल्ली)

या कथा सर्व वयोगटातील वाचकांना आवडणाऱ्या आहेत.यात आपल्या आवती भवती असलेल्या माणसांचे प्रतिबिंब पाहायला मिळते.चुकून एखाद्या कथेतील नायक आपणच आहोत असेही वाटू लागते...

यात आढळणारी नावे आणि परंपरा वाचकाला न कळत दक्षिण भारतात घेऊन जातात.पुरुष वाचकाला आपण ही लुंगी नेसली आहे असे वाटायला लागले तर नवल नाही... इतका तो त्या कथांमध्ये रंगून जातो.

मालगुडी शोधायला गेले तर नकाशावर कुठेच सापडणार नाही.कारण ते अस्तित्वातच नाही.एखादे काल्पनिक गाव इतके वाचकांच्या मनात वसावे यातच लेखकाचे यश आहे.ही त्याची प्रतिभा आहे!


मालगुडी डेज ही आर.के. नारायणलिखित कथामालिका आहे. १९३५ साली त्यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेण्ड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट दी गाईड. यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. तर त्यांच्या मिस्टर संपत आणि दी फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्ताकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या गोष्टींवर आधारीत दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.

साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तर मालगुडी डेज बद्दल लहानपणापासून आकर्षण होतं दुरदर्शन वर खूप वेळा ही मालिका मी बघायचे आपल्याही काही आठवणी या मालिकेसोबतच्या खूप आठवणी आहेत....


यालेखामुळे बालपण निश्चित आठवेल....ही मालिका पाहण्यासाठी केलेली कसरत ही आठवेल....


सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.