नचिकेताचे उपाख्यान – बदलत्या जीवनशैलीचा वेध

नचिकेताचे उपाख्यान – बदलत्या जीवनशैलीचा वेध


नचिकेताचे उपाख्यान – बदलत्या जीवनशैलीचा वेध घेत जीवन-मृत्यूवर चर्चा करू पाहणारी कादंबरी

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः।
श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्शेमाद्‌वृणीते॥ - कठोपनिषद (१: २: २)

हा श्लोक आहे कठोपनिषदमधला! काळ आहे वेदांचा, ऋषीमुनींचा आणि यज्ञांचा! नचिकेत लहान मुलगा आहे. तो आपल्या वडिलांना यज्ञात वेगवेगळ्या गोष्टींचे दान, निरनिराळ्या देवतांना देताना पाहत असतो. सगळीकडे असलेले दानाचे, त्यागाचे वातावरण पाहून त्याच्याही मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि तो आपल्या वडिलांमागे विचारायला लागतो, “बाबा, मला कुणाला दान देणार तुम्ही?” वारंवार हा प्रश्न विचारून त्यांच्या कामात अडचण आल्यामुळे ते चिडून म्हणतात, “जा, मी तुला मृत्यूदेवतेला दान देतो!” आणि नचिकेत ते बोलणे गंभीरपणे घेऊन यमाकडे जातो! तिथे त्याची आणि यमाची जी चर्चा होते, जीवन आणि मृत्यू तत्वज्ञानविषयक जो संवाद होतो, तो या कठोपनिषदाचा मुख्य आशय आहे. 'संजय भास्कर जोशी' लिखित 'नचिकेताचे उपाख्यान' या १९९६ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीचा मुख्य आशयसुद्धा हाच आहे: फक्त, हे उपनिषद आधुनिक आहे, या युगाचे आहे, आपल्या काळाचे आहे!

नचिकेत हा या कादंबरीचा नायक असून तो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारा पस्तिशीतला तरुण आहे. त्याची जबरी महत्वाकांक्षा, त्याची हुशारी याच्या जोरावर तो अनेक उच्च पदे मिळवत जातो, ही कथानकाची रूपरेखा आहे. परंतु, अशा प्रकारे एका बाजूला उंचीवर जात असताना त्याच्या खाजगी आयुष्यात मात्र त्याची नकळत अधोगती होत राहते. अर्थात, ही महत्वाकांक्षेलाच विरोध करण्याच्या उद्देशाने जन्माला आलेली टिपिकल कादंबरी नाही. आपल्या सभोवतालच्या वास्तवात होत असलेल्या, लौकिकार्थाने यशस्वी लोकांच्या आत्महत्या, तसेच आपल्या पिढीतल्या अनेकांसमोर असलेला जीवनविषय, यश या संकल्पनेविषयक दृष्टीकोन, संभ्रम या कादंबरीच्या अस्तित्वाची गरज दर्शवितात. या कादंबरीची काही वैशिष्ट्ये म्हणजे ही कादंबरी, “महत्वाकांक्षेसाठी तत्वांशी तडजोड” करण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करते. वेगवेगळ्या लाभासाठी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये केल्या जाणाऱ्या सो कॉल्ड “खेळ्या”, आणि त्यातून होणारे नैतिक अध: पतन यांच्या दर्शनातून कादंबरी, या स्वार्थी प्रवृत्तीवर टीका करते. त्याचसोबत, अशा गोष्टी करत असताना, नकळत कुठेतरी संवेदनशील मनावर येणारा ताण, त्यातून होणारी तगमग आणि एकुणात जीवनातील सौख्य हरवून जाणे आणि मग जाणीवपूर्वक वा अजाणतेपणाने केली जाणारी (अथवा होणारी) आत्महत्या, या प्रक्रियेवर ही कादंबरी प्रकाश टाकते. आणि हे सगळं करत असताना, नकळत ती जीवन-मृत्यूविषयक चर्चा करत राहते. या चर्चा, वर म्हटल्याप्रमाणे केवळ अध्यात्मिक अथवा तत्वज्ञानाच्या पातळीवरच्या चर्चा राहत नाहीत, तर त्या खूप व्यावहारिक स्पष्ट आणि हृदयाला भिडणाऱ्या अशा आहेत. कादंबरी वाचताना नकळत वाचकाला स्वतःच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे आकलन पुन्हा एकवार तपासून पाहावेसे वाटेल, असा परिणाम ही कादंबरी करते. आधुनिक संस्कृतीत असलेला नात्यांमधला मोकळेपणा, भौतिकतावाद, विज्ञाननिष्ठा या अनेकविध वैशिष्ट्यांचे दर्शन आपल्याला या कादंबरीमध्ये होते. उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि त्याचसोबत बुद्धिप्रामाण्यवादी, चर्चोत्सुक अशा पात्रांचे चित्रण यात येते. या सतत होणाऱ्या चर्चा, गप्पा आणि त्यातून होणारी निर्भीड चर्चा या गोष्टी कादंबरीला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतात.(पण नकळत, तिचे आकलन जड सुद्धा करतात!)

अशाप्रकारे, एकूणच आधुनिक जीवनशैलीतल्या चांगल्या गोष्टींचे समर्थन करत असतानाच, आपल्या महत्वाकांक्षेपायी आयुष्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे – सौख्य अथवा आनंद, आपण हरवून बसत आहोत का, असा प्रश्न लेखक निर्माण करतो. या सगळ्या चर्चांमधून तो जीवन-मृत्यू विषयक तत्वज्ञान आधुनिक पार्श्वभूमीवर मांडू पाहतो, त्याची चर्चा करू इच्छितो, म्हणूनच कादंबरीचे नाव “नचिकेताचे उपाख्यान” असे आहे! या कादंबरीत लेखक म्हणतो, “दर शंभर वर्षांनी वेदांचं आणि उपनिषदांचं पुन:पुन्हा लेखन व्हायला हवं. प्रत्येक युगाचं वेगळं उपनिषद हवं!” हेच पुनर्लेखन वाचण्यासाठी, आधुनिक मूल्य समजून घेण्यासाठी आणि त्याचसोबत आजच्या जीवनशैलीतल्या अति-महत्वाकांक्षेच्या प्रवृत्तीला समजून घेण्यासाठी वाचायलाच हवी अशी कादंबरी: नचिकेताचे उपाख्यान!

(आणि हो, सुरुवातीला दिलेल्या श्लोकाचा आशय: नैतिक/चांगली गोष्ट आणि आवडीची गोष्ट या दोन्हीमध्ये निवडीचा प्रसंग येईल, तेव्हा विचारशील माणूस सर्व बाजूंनी त्यांचे परीक्षण करेल आणि त्या दोन गोष्टींमध्ये अंतर आहे याची त्याला जाणीव होईल, कारण बुद्धिमान माणूस हा “आवडत्या” गोष्टीपेक्षा “योग्य” गोष्टीला प्राधान्य देतो. तर, अविचारी माणूस हा त्याच्या भौतिक सुखासाठी त्याला “आवडत्या” गोष्टीची निवड करेल.
अजून एक गोष्ट: पुस्तकाच्या मुखपृष्ठाला द. मा. मिरासदारांच्या एका गोष्टीचा संदर्भ आहे. त्या गोष्टीचा शोध तुम्हीच घ्या: "राजाला स्वतःचे लग्न करायचे आहे -एक राजकुमारी जिला बुद्धिमान नवरा हवा आहे-आणि राजाचा विदुषक हा राजाला ही राजकुमारी मिळवून देण्यात मदत करतो" अशी रूपरेषा असलेली ही कथा! या पुस्तकातसुद्धा ती मिळेलच, पुस्तकाच्या आशयाशी तिचा जवळचा संबंध आहे!)




सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.