मानाचा मुजरा

*मानाचा मुजरा  छत्रपती शिवाजी महाराजांना*



गौरव राजांचा करु जय जय शिवराया
नसे तुमच्यावीण कोणी स्वराज स्थापाया ||धृ ||

शहाजी जिजाऊ उदरी जन्म झालासे 
शिवनेरी गडावरती तुतारी वाजतसे 
महाराष्ट्रावर भवानी माता प्रसन्न असे 
हिंदू धर्म रक्षणार्थ शिवाजी अवतरसे ||१ ||

रामायण महाभारत गोष्टी सांगूनी 
जिजाऊ साहेब करिती संस्कार शिवमनी 
दादोजी कोंडदेव शिक्षण देऊनी 
शिकवीती शिवबांना लढावे कसे रणी ||२ ||

मावळ प्रांतातील शूर सवंगडी जमले 
करांगुली रक्ताने महादेवा अभिषेकीले 
हर हर महादेव म्हणता बाहू सरसावले 
स्वराज्यासाठी प्रथम तोरणा जिंकीले ||३ ||

प्रतापगडावरी अफझलखान आला 
राजे भेटती त्यासी विषारी वाघनखाला 
घेऊनी दूर सारिले सय्यद बंडाला 
कोथळा बाहेर काढला मारून खानाला ||४||

पुण्यात शायिस्तेखान लाल महाली येता 
बेसावध क्षणी त्यावरी हल्ला करता 
गनिमी कावा साधून तोडियले बोटा
भयाने खान दिल्लीस पळूनिया जाता ||५||

औरंगजेबाने दिल्लीस भेटीस बोलविले 
कपटाने राजांना कैदेत टाकीले 
बहुयुक्तीने राजे पेटा-यात बसले 
कोणाच्याही नकळत आग्र्याहून सुटले ||६||

रायगड राजगड असे स्वराज राजधानी 
राज्याभिषेक केला गागाभट्टांनी 
राज्याची घडी बसविली अष्टप्रधानांनी 
शिवशक, शिवराजमुद्रा घडविली राजांनी ||७||

गडदुर्ग जलदुर्ग  स्वराज्यी बांधियले 
अध्यात्मिक गुरूंना आदराने वंदियले 
तुकाराम रामदासांनी आशीर्वाद दिधले 
शिवाजीमहाराज राजे रयतेचे झाले ||८||

क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण पालक 
दुष्टांचे निर्दालक सुजनांचे तारक 
हिंदू धर्माचे तुम्ही होतात रक्षक 
हिंदवी स्वराज्याचे तुम्ही संस्थापक ||९||

राजांना विनविते जोडोनी दोन्ही करा 
सुराज्य स्थापनेसाठी पुन्हा अवतार धरा 
राजा शिवछत्रपती हाच आदर्श खरा 
 करिते तुम्हा मानाचा मुजरा ||१०||



सौ.  मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*