स्वप्नांचा पाठलाग :- जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल
स्वप्नांचा पाठलाग :- जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल
लेखक रिचर्ड बाक लिखित व बाबा भांड यांनी अनुवादित केलेल जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल पुस्तक वाचनात आले.
काही माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात आपल्या कृतीतून जगण्याचे नियम बनवुन यशस्वी होतात,त्यांची ही गोष्ट. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल एक समुद्रपक्षी. बहुतांशी समुद्रपक्ष्यांचं जगणं साधा सरळ असतं. दोन वेळच्या खाण्यासाठी धडपडणं, पोटाची खळगी भरणं, समुद्रकिनार्यापासून अन्न मिळते त्या ठिकाणापर्यंत उडत जाणं आणि परत येणं एवढेच त्यांचे आयुष्य. काही पक्षी उडण्यापेक्षा खायला काय मिळतं हेच महत्त्वाचं मानत.मात्र या सगळ्यांपेक्षा जोनाथन लिव्हिंगस्टनला उडताना खूप आनंद होई. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवण्याचा मार्ग म्हणजे सतत उडत राहणं नव्हे हे त्याच्या लक्षात आलं होतं. आकाशात खूप उंचीवरून सहजपणे भरारी घेण्याचे त्याचे स्वप्न होतं. त्याची आई काळजीपोटी कुरकुरे," इतर पक्ष्यांप्रमाणे का वागत नाही? इतर समुद्रपक्षी बघ ...सगळे कमी जोखमीच्या उंचीवरून उडत असतात. तरीही जोनाथन आपल्या म्हणण्यावर ठाम असे.आकाशात जास्तीत जास्त उंचीवरून ,जास्तीत जास्त मैल आणि जास्तीत जास्त वेगाने सर्व संतुलनासह उडणे आणि आयुष्यातील अविस्मरणीय खजाना अनुभवणे हे त्याचे ध्येय होते . ध्येयाप्रत जाताना मध्येच वाटेमध्ये आलेल्या अडचणींमुळे त्याच्या मनात येत असे- " आहे ते इतरांप्रमाणे आयुष्य ठीक आहे . नवीन शिकलं पाहिजे अशी कोणतीही सक्ती नाही ,वेगळं काही करायचं असं समोर आव्हान नाही आणि अपयशाची भीती नाही.सुंदर आहे हे जगणं! परंतु हे विचार मनात येताक्षणीच तो विचारचक्र तिथेच थांबवायचा. आतला खोल आवाज चिरकायचा- "समुद्रपक्षी काळोखात कधीच उडत नसतात!"
पुढे 214 मैल वेगाने उडण्याचा विक्रम जोनाथन करतो , आठ हजार फूट उंचीवर स्वतःला सांभाळत पलटी घेण्याचा शोधही लावतो .या गोष्टीबद्दल जेव्हा समुद्र पक्षांच्या थव्यात कळते तेव्हा जोनाथनला थव्यातून बहिष्कृत केले जाते . परंपरा आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन केल्यामुळे जीवनातला एक ज्येष्ठ समुद्रपक्षी स्वच्छंदी एकाकी जीवन दूर कड्यांवर साजरं करण्यास सांगतो.परंतु जोनाथन एवढ्या गोष्टीने खचून जात नाही जोनाथन सिगलच्या हाती एक सत्य गवसलं होतं. आळस ,भीती अन् राग समुद्र पक्ष्यांच्या दुःखाचे मूळ कारण आहे .या सर्व गोष्टींना जवळ फिरकूही दिलं नाही की सुरू होतो मुक्तानंदाचा प्रवास आणि दीर्घायुषी सुंदर जगणं .शेवटी तुम्ही करता त्या गोष्टीतली पारंगतता हाच खरा स्वर्ग. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता फक्त तुमची तशी इच्छाशक्ती हवी आणि आपल्या आवाजाने प्रोत्साहन द्यावयास हवे.
चियाॅंग नावाचा समुद्रपक्षी जोनाथनला मार्गामध्ये भेटतो आणि एक सूत्र सांगतो ते जोनाथन सीगल कायम मनामध्ये ठेवून चिंतन करतो तशी कृतीही करतो. ते सूत्र असे:- "नवं शिकणं आणि त्याचा सराव करणं ही साधना आहे.साधनेत सातत्य हवं. सातत्याने सहजता येते. सहजतेतून निर्दोषता तयार होते. पारंगतता जीवनातील मुख्य मूल्य बनते .म्हणून त्याचा ध्यास सुरू ठेवा . मधे कधीही थांबू नका."
जोनाथन सिगलला काही काळाने पुन्हा थव्यामध्ये सामील करण्यात येते. तो इतका पारंगत होतो की इतर तरुण पक्ष्यांना मार्गदर्शन करू लागतो ,आत्मबळ ओळखण्यासाठी मदत करू लागतो. क्षितिजापलीकडे एक विलक्षण आणि अनुभव अद्भुत अनुभव मिळतो हे खूप मैलांवरून सर्वांना दाखवून देतो. समुद्रपक्षी फक्त दूरचे आणि सर्वात उंच उडणारेच पाहतो असा वाक्प्रचार आहे. त्याप्रमाणे इतर पक्षी स्वतःच्या पंखाचे टोक सुद्धा बघू शकत नसतं. त्यांना तो पंखात बळ भरण्याची ,त्यांच्यामधील कुवत दाखवून देतो.
अशी सुंदर दंतकथा एकेक पान वाचत जाऊ तशी उलगडत जाते. आपल्या दररोजच्या जगण्यात आपलं इप्सीत शोधण्याचा मार्ग दाखविणारी गोष्ट. समुद्र पक्ष्यांचा कळप, त्यांचं त्यांचे रितिरिवाज व कायदेकानून रूपक म्हणून आले आहेत. ही कथा आपल्या प्रत्येकामध्ये असणाऱ्या सुप्तावस्थेतील जोनाथन सीगलसाठी प्रेरणादायक आहे. स्वप्नांचा पाठलाग केला आणि समाजातील नकारात्मक गोष्टी ,अडचणी याकडे लक्ष दिले नाही तर अतिउच्च शिखरावर पोहोचता येतं हे या गोष्टीचं सार आहे. ते आपण आमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करू.
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment