बंधन
*बंधन*
"खबरदार! किसी ने गड़बड़ी की तो ! एकेक को
गाड़ी के नीचे फेक दूंगा!"
अंधेरी हून लोकल सुटली. तसा एक गर्दुल्या लेडीज डब्यात शिरला. हातात चाकू होता. केस पिंजारलेले होते, दाढी वाढलेली होती अन् डोळे लालसर, पेंगुळलेले होते.
दुपारची वेळ असल्यानं गाडीत गर्दी नव्हती. डब्यात एका बाजूला खिडकीजवळ वीणा बसलेली होती. दुसऱ्या बाजूला अपडाऊन करणाऱ्या पाच-सहा मुलींचा घोळका होता. आतापर्यंत त्यांची आपसात हास्य विनोद व बडबड चालू होती. ती एकदम बंद झाली. डब्यात क्षणातच शांतता पसरली. गाडीचा खडखडाट तेवढा ऐकू येत होता, त्या गर्दुल्यानं इकडे तिकडे पाहिलं नि तो वीणाकडे वळला.
आधीच घाबरलेल्या वीणाचे हातपाय लटलट कापू लागले. तोंडातून शब्द फुटत नव्हता. डोळ्यात अश्रू जमा झाले. तिनं हातातील राख्यांकडे पाहिलं. ती अगतिकपणे उभी राहिली. तिला वाटलं आजचा दिवस काही बरा नाही.
आज रक्षाबंधन आहे म्हणून वीणा घरची कामं आटपली नि सकाळी दहा वाजता दादरला राख्या व इतर सामान खरेदी करण्यासाठी आली. दादरला स्टेशनवर उतरली तेव्हाच एकजण कुणीतरी तिच्या अंगावर येऊन धडकला. तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नि ती मार्केटकडे वळली. राख्यांच्या दुकानात ही गर्दी होती. सर्वदूर गर्दीचा महापूरच पसरलेला होता. कशीबशी ती त्या दुकानाजवळ गेली. राख्या पसंत करून दुकानदाराला पैसे दिले. तोच एका माणसाची जोरदार धडक तिला बसली. तिनं मागं वळून पाहिलं तोवर तो माणूस झपाट्यानं दूर जाताना दिसला. ती दुसर्या दुकानात खरेदीसाठी गेली पण तिला काहीतरी होत होतं; अस्वस्थ वाटत होतं. एवढ्या प्रचंड गर्दीतही तिला एकाकी वाटू लागलं होतं. कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवतंय असं वाटू लागलं,
तिनं बाकीची खरेदी तशीच राहू दिली. घाबरत घाबरतच ती स्टेशनकडे वळली. धावत धावत तिने चर्चगेट-विरार फास्ट लोकल पकडली. 'हाश हुश्श करीत ती लेडीज डब्यात चढून खिडकीजवळ बसली. गाडीत पाच-सहाच मुली होत्या. गाडी सुटली तसा तिनं सुटकेचा निश्वास टाकला. बाहेरच्या
थंड हवेनं बरं वाटलं. पण अंधेरीहून गाडी सुटली तर तिच्यापुढे हा प्रसंग उभा ठाकला होता.
"चल, निकाल बॅग !"
गर्दुल्या वीणाकडे सरकू लागला होता. वीणा घाबरली होती. तिला काहीच सुचेनासं झाले. हातात राख्या होत्या. खांद्यावर पैशांची बॅग होती. डब्यातील इतर मुलीही अवाक होऊन पाहात होत्या. काय करावं हे त्यांनाही सुचेना.
गर्दुल्या चाकू दाखवत वीणाजवळ आला.
"चल, निकाल बॅग ! नही तो देख लेना !' चाकू नाचवत तो बोलला.
आता आपली काही धडगत नाही. ती क्षणभरच गोंधळली. तिला जयबाला आशर आठवली. तिच्यावरील तो कठीण प्रसंग आठवला. तिची संकटाला धडक देणारी हिंमत आठवली. जयबालाच्या या आठवणीनं तिची हिंमत बांधली गेली. काहीही होऊदे या गर्दुल्याला धडा शिकवलाच पाहिजे असा विचार तिच्या मनात येऊन गेला. तिनं हातातील राख्या व बॅग घट्ट पकडली नि ओरडली
"नहीं हूँ ! तो क्या कर लेगा रे?'
या अनपेक्षित उत्तराने तो गर्दुल्या घाबरला अन् डब्यातील इतर मुलींना हिंमत आली. त्यांनीही वीणाला मदत करायचा निर्णय मनातल्या मनात घेतला. तोपर्यंत वीणा अन् त्या गर्दुल्याची झटापट सुरु झाली होती. गर्दुल्या अन् वीणा एकमेकांशी झुंजत होते, लोटालोटी करत होते. ती झटापट करता करता ते गाडीच्या दरवाज्याजवळ आले. गाडी फास्ट असल्यानं वेगाने धावत होती, गर्दुल्यानं वीणाला दरवाज्यातून बाहेर फेकण्याच्या विचारानं लोटले. पण दुसऱ्याच क्षणी गाडीतील दोन मुलींनी धावत येऊन वीणाला सावरले. तिला गाडीतून खाली पडता पडता वाचवले. अन् दुसऱ्या दोन तीन मुलींनी त्या गर्दुल्याला मागून पकडून मागच्या मागे ढकलले. या अनपेक्षित हल्ल्यानं तो खाली दरवाज्याजवळच कोलमडला. धडपडत धडपडत उठतांना तो स्वतःला सावरू शकला नाही. गाडीच्या बाहेर फेकला गेला अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मोठ्या संकटातून त्यांनी एकमेकांना तसेच एका भगिनीला सोडवलं होतं. त्या आनंदानं त्यांनी एकमेकींना घट्ट मिठीच मारली. त्यात वीणाही होती.
हे सारं पाहून वीणा आपलं भान विसरली. तिला क्षणभर चक्कर आल्यासारखी वाटली नि ती खाली घसरू लागली. त्या मुलींनी तिला खाली झोपवलं. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे झपके मारले. थोड्या वेळातच ती भानावर आली. आपण सुरक्षित असल्याचं पाहून तिला हायसं वाटलं. तिनं हातातील पुडीकडे बघितले. आपल्या भावांसाठी घेतलेल्या राख्या अजूनही तिच्या हातात होत्या. तिने ती पुडी सोडली. एकेक राखी, तिचा धागा मोकळा केला. अन् एकेक करून वीणानं पाचही मुलींच्या हातावर राख्या बांधल्या. त्या मुली आश्चर्यानं कधी वीणाकडे तर कधी त्या राखीकडे बघत राहिल्या.
'हे काय ताई ? भावाला बांधायच्या राख्या तू आमच्या " हातावर बांधल्यास!"
वीणानं त्या मुलींकडे पाहिलं. वीणाच्या गालावरून अश्रू ओघळत होते. ओठ बोलण्यासाठी थरथरत होते पण त्यातून शब्द फुटत नव्हते. थोड्या वेळानं वीणानं स्वतःला सावरलं. आपले अश्रू पुसले अन् बोलली
"मी तुमची ताई तर तुम्ही माझ्या भगिनीच आहात. आज रक्षाबंधन. भावासाठी राख्या आणायला गेले अन् हा प्रसंग माझ्यावर ओढवला. हा प्रसंग अगदी माझ्या प्राणावर बेतला होता. कठीण प्रसंगी भावाने बहिणीचं रक्षण करावं म्हणून ही राखी भावाच्या हातावर बांधली जाते. आजच्या संकटात तुम्ही माझी मदत केली. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता माझे प्राण वाचवले. आज जमाना बदलला. प्रत्येक प्रसंगाच्या वेळी आपलं रक्षण करण्यासाठी आपला भाऊ आपल्याबरोबर असेलच असं नाही. म्हणून सध्याच्या काळात एका भगिनीने दुसऱ्या भगिनीचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे. त्यासाठी झगडलं पाहिजे म्हणून प्रत्येक स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीच्या हातावर हे बंधन बांधलं पाहिजे. हे रेशमी बंधन रक्ताच्या नात्याचं नसेल पण ते बंधन... ते बंधन असेल प्रेमाचं अन् एका स्त्रीच्या रक्षणाचं.... ! स्त्रीच्या रक्षणाचं बंधन असेल !"
वीणा रडत होती. बोलत होती. त्या मुलींनी तिला सावरलं. प्रत्येकीनं आपल्या बॅगमधून एकेक रेशमी बंधन काढलं वीणाच्या हातावर बांधलं. वीणानं त्या मुलीकडे पाहिलं.
अन् 'स्त्रीनं स्त्रीच्या रक्षणासाठी बांधलेलं रेशमी बंधन' आपल्या डोळ्यातील आनंदाश्रूंनी भिजवत राहिली अन् आपल्या ओठांनी चुंबित राहिली ते "रक्षेचं बंधन
Comments
Post a Comment