देवाजीचं ऑफिस

देवाजीचं ऑफिस

केरळमधल्या खेड्यातून मायक्रोसॉफ्टच राष्ट्रीय पातळीवरचं काम करणाऱ्या जेम्स जोसेफ या अवलियानं त्याची कहाणी या पुस्तकात मांडली आहे. वर्क फ्रॉम होम हि कल्पना हळूहळू रुजत असताना जॅम्सनं केरळमधल्या खेडेवजा शहरात जाण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळे अडथळे पार पाडत त्यानं तिथून काम केलं. त्या सगळ्या अनुभवांविषयी त्यानं लिहिलं आहे. व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल साधण्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक... नोकरी करणाऱ्या, विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लाब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे जेम्स जोसेफ यांचं ‘गॉड्स ओन ऑफिस’ हे पुस्तक. ‘देवाजीचं ऑफिस’ या शीर्षकासह त्याचा अनुवाद केला आहे सुनीता कट्टी यांनी. जेम्स यांना पाच भावंडं. ते सहावे. ते दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईला कॅन्सर झाला आणि त्याच वेळेला वडिलांना अपघात होऊन ते कोमात गेले; पण तीन महिन्यांनंतर ते कोमातून बाहेर आले. जेम्स यांच्या आईचं मात्र निधन झालं. आईच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी सहाही मुलांना वसतिगृहात ठेवलं. जेम्सच्या आईच्या माहेरच्या नातेवाईकांनी या सहाही भावंडांना भक्कम मानसिक आधार दिला. जेम्स इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा त्यांच्या वडिलांना परत अपघात झाला आणि ते कोमात गेले; मात्र या वेळेला ते कोमातून बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांचा मृत्यू झाला. जेम्सची आणि त्यांच्या पत्नीची ओळख कशी झाली आणि त्यांचं लग्न कसं झालं,याबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. आपल्या मुलींबद्दलही ते बोलतात. एकूण त्यांचं विवाहपूर्व जीवन असो किंवा विवाहानंतरचं, त्यांच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे घट्ट स्नेहबंध जाणवत राहतात. आपल्या गावाविषयीची, तेथील लोकांविषयीची त्यांची आपुलकी लक्षात येते. जेम्स यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात,याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भातील जे जे उल्लेख या पुस्तकात आले आहेत, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की घरातून काम करताना ते कुठेही ढेपाळत नाहीत. उलट त्यांचा कामाचा वेग वाढलेला आहे. घरातून काम करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, घरातून काम करतानाही आपल्या सहकाऱ्याशी कसं जोडलेलं रहावं, याबद्दलही ते सांगतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोकांशी बसल्या जागी संपर्क साधून काम कसं करता येऊ शकतं, हे या पुस्तकावरून समजतं. घरातून काम करतानाही ऑफिसइतक्याच कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, असा मूलमंत्रही या पुस्तकातून मिळतो. या पुस्तकाच्या शेवटी जेम्स यांनी घरातून काम करायची इच्छा असेल तर कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात याचं मार्गदर्शन केलं आहे. एकूणच, घरातून काम करतानाचं तुमचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन कसं असतं, याचं अगदी साध्या, सोप्या भाषेत निवेदन या पुस्तकात केलं आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना (विशेषत: मॅनेजर लेव्हलच्या) अशी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर परदेशस्थ भारतीय परत भारतात येऊ शकतात, अशी सूचनाही जोसेफ यांनी केली आहे. जोसेफ यांनी या पुस्तकात सुरुवातीला नमूद केलं आहे, ‘मोठा मासा बनून मोठ्या जलाशयात राहणं आणि लहान मासा बनून लहान तलावात राहणं, या दोन्ही गोष्टी मनाला सारखंच समाधान देतात.

पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जेम्स यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यांसाठी ते एक उदाहरण आहेत. साधी, सोपी आणि ओघवती भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं. अर्थातच त्याचं श्रेय जेम्स यांच्याबरोबर सुनीता कट्टी यांनाही द्यायला हवं. तेव्हा घरातून काम करण्याच्या या प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हायला सगळ्यांना नक्कीच आवडेल ज्यांना घरातून काम करायची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.




सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.