नांगरणी
नांगरणी
नांगरणी हा सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग. आत्मचरित्राचा पहिला भाग झोंबी ज्यामध्ये आपण सर्व अडीअडचणींवर मात करून शिक्षणाच्या मार्गाने आयुष्य बदलण्याची लढाई लढणारा आनंद पाहिला. हा पहिला भाग जिथे संपतो तिथेच दुसरा भाग सुरू होतो.
एस एस सी पास झालेल्या आपल्या पोरानी आता कुठतरी एखादी नोकरी पकडावी आणि आपल्या घरादाराला चार सुखाचे घास मिळवून द्यावे अशी आशा आता आनंदच्या आई दादाला लागली आहे. पण आनंदला मात्र आता कळू लागलंय की आता इथ थांबून चालायच नाही. आपल्याला जर आयुष्यात काही बनायचं असेल तर आधी आपल शिक्षण पूर्ण करावं लागेल. मग काय आनंदची पुन्हा एकदा शिकायची धडपड सुरू होते. त्या तळमळीतूनच आनंद समाजातल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांकडे मदतीच्या आशेने जातो पण तेव्हा त्याला कळते की समाजात प्रतिष्ठित म्हटले जाणारे सगळेच काही दिलदार आणि संवेदनशील नसतात. शेवटी निराश मनाने आनंद गावी परततो. तेव्हा गावातल्याच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तो निघतो रत्नागिरी कडे आपल पुढचं शिक्षण पूर्ण करायला.
या सगळ्या काळात त्याच्या मनातल्या भावभावनांना तो कवितेच्या रूपाने कागदावर मांडायला सुरू करतो. आणि मग याच कविता त्याला घेऊन जातात महाराष्ट्रातल्या एका उत्तुंग अशा व्यक्तिमत्त्वाकडे म्हणजेच पू ल देशपांडे यांच्याकडे. त्यांच्या सहवासात आल्यावर आनंदचा शिक्षणासाठीचा संघर्ष थोडासा का होईना पण कमी होतो. त्यातच आता आनंदचा कॉलेज आणि समाजात अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी संपर्क होऊ लागतोय. आणि त्या माणसांकडून आनंद आयुष्याचे नवनवीन धडे शिकू लागतो. अशातच आनंदला संधी मिळते रेडिओ साठी एक कार्यक्रम करायची. ही संधी आनंदला एक नवाच आत्मविश्वास देऊन जाते. आणि आनंद कॉलेजच पहिलं वर्ष संपवून घरी परततो.
आणि त्याच्या समोर एक नवीन संकट उभ राहतं त्यामुळं तो आता रत्नागिरीला शिकायला जाऊ शकत नाही. या अडचणीच्या वेळी पु.ल. त्याला पुन्हा एकदा आधार देतात. आणि त्यांच्या शिफारशीमुळे आनंद कोल्हापुरातच पुढचं शिक्षण सुरू करतो. आता इथ मात्र त्याला समाजातील चांगल्या माणसांचा सहवास मिळू लागला आहे तेव्हा आता आनंदचा संघर्ष थोडा का होईना कमी होऊ लागतो. आणि एक परिपक्व माणूस होण्याकडे आनंदचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात त्याला अनेक जिवलग मित्र अनेक प्रसिद्ध साहित्यिक भेटतात. या सर्वांसोबत राहून आनंद हळू हळू आपल्या स्वप्नपूर्तीच्या मार्गावर पुढे पावल टाकू लागतो. अशातच आनंदला पुणे आकाशवणीवर नोकरी मिळते. आणि मग आनंद येऊन पोहचतो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये. आता तो पुण्यात नोकरी करता करता त्याच्या पुढील एम. ए. च्या शिक्षणालादेखील सुरुवात करतो.पुणे आकाशवाणीत नोकरी करताना आनंदला वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांशी संबंध येतो. आणि ती लोक त्याला वेगवेगळे अनुभव देत माणूस म्हणून अधिकच परिपक्व बनवतात. आणि तिथंच आनंदला त्याच खर धेय्य सापडत. आणि मग त्यासाठी आनंद आकाशवाणीतील नोकरी सोडायचं ठरवतो आणि संपूर्ण लक्ष एम. ए. च्या परीक्षेवर केंद्रित करतो. शेवटी ती परीक्षा तो उत्तीर्ण होतो. आता धडपड सुरू होते नोकरीची. आणि शेवटी आनंदला रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक पदावर काम करण्याची संधी मिळते.
आणि अशा वळणावर येऊन आनंद यादवांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग संपतो.
हे पुस्तक वाचताना आपल्याला पदोपदी हे जाणवत की आपल्या मनाचा निर्धार ठाम असेल तर आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी विचलित न होता आपल्या धेय्याकडे चालत राहील तर आपल्या समाजातूनच अनेक हात आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला पुढे येतात आणि आपल्या मार्गातील अडचणीच आपल्या प्रवासातील मार्गदर्शक बनून यशाचा मार्ग आणखी प्रशस्त करतात.
तेव्हा प्रत्येक वाचनप्रेमीने वाचलेच पाहिजे असे हे आत्मकथन तुम्ही सर्वांनी नक्की वाचा.
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment