मी आणि कविता
*मी आणि कविता*
मी तहान आणिक तू नदीचा काठ
तू पूर्वदिशा मी भरकटलेली वाट
मी प्रश्नांच्या गर्तेत अडकते जेव्हा
तू एक कल्पना सुचलेली भन्नाट
तू भिक्षा अन् मी बैराग्याची झोळी
तू मंदिरातली ब्रह्मानंदी टाळी
मी शिशीर हळवी खिन्न ऐकटी सांज
तू लता-रफीचे गाणे कातरवेळी
मी वृत्त आणि तू खयाल गजले मधला
तू गर्भितार्थ जो कविता व्यापुन उरला
मी कागद कोरे, सुन्न रिकामे अंगण
तू शाईमधूनी आशय पाझरलेला
तू श्यामसावळा मी राधेची साद
तू अष्टमीतली मध्यरात्र अल्हाद
मी गोकुळ,मथुरा,वृंदावन एकाकी
मी युगयुगांच्या विरहाची फिर्याद
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment