आठवण कृष्णाची

आठवण कृष्णाची


नीलकांती रावा । वाजवितो पावा।
वृंदावनी धावा । राधिकेचा ॥

कुण्या झाडावर । कुण्या फ़ांदीवर ।
लपलेला पोर । यशोदेचा ॥

धावती पाखरे । सारी गाय गुरे ।
ऐकूनी बासरी । कृष्णापाठी ॥

सावरले तन । आवरेना मन ।
कसे संमोहन । नदीकाठी ॥

मागूनी येईल । ओढावया वेणी ।
हूरहूर मनी । किती वेळ ॥

घागर भराया । भिजवली काया ।
बिलगले पाया । मृगजळ ॥

सावळा मुरारी । गाठूनी दुपारी ।
उभा वाटेवरी । कैसा नाही ॥

घागर फ़ुटावी । बांगडी टिचावी ।
गालावर लाली । आली नाही ॥

सांगायाचे काही । बोलायाचे नाही ।
काळजाच्या डोही । काय चाले ॥

आठवण आली । भेट नाही झाली । 
पापणीचे तीर । पुन्हा ओले ॥


 
 -- सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*