अॅज आय सी

अ‍ॅज आय सी’ - नेतृत्व आणि प्रशासन


डॉ. किरण बेदी! भारतीय पोलीस सेवेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्या स्त्री-अधिकारी. रॅमन मॅगसेसेसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित. विविध समाजोपयोगी कामांतून महत्त्वाचा सहभाग. वेळात वेळ काढून स्तंभलेखन या आधी काही पुस्तकांचे प्रकाशन. इ. इ. हा बायोडेटा’ सर्वांना माहीत असेलच. तो पुन्हा आठवण्याचे कारण त्यांचे ‘अ‍ॅज आय सी...’ हे  पुस्तक होय. ‘द ट्रिब्यून’ आणि ‘पंजाब केसरी’मध्ये सातत्याने आलेल्या शंभर लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. समाज आणि त्यात घडणाऱ्या असंख्य लहान-मोठ्या घडामोडींवर बेदींचे बारीक लक्ष दिसते. किंबहुंना तो त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. भारतीय पोलीस सेवेदरम्यान आलेले अनुभव या लेखांतून आधिक्याने जाणवतात. पोलीस, प्रशिक्षण केंद्र, पोलिसांची जीवनशैली, त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेसोबतच सेवाकार्याचा वारसा चालावा, सांगण्याची धडपड या लेखांतून दिसते. ‘स्त्री’ हा किरण बेदीचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय मानता येईल. स्त्री शिक्षण, सबलीकरण, अनिष्ट प्रथावृत्तींच्या विरोधात ठामपणे उभे राहणे, स्त्री-शक्तीची जाणीव करून देणे असे कार्य या लेखाद्वारे होताना दिसते. देशाचे भावी नागरिक कसे हवेत, त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांचा सर्वांगीण विकास यादृष्टीने मुलांच्या भवितव्याचा विचार बेदी या लेखात करताना दिसतात. सैनिकांचे बलिदान, देशाभिमान, आपल्या उपयुक्त आर्दर्श ठरणाऱ्या परंपरा त्या वाचकांपुढे ठेवतात. तशाच समाजात चालणारे गैरव्यवहार, साध्या साध्या वाटणाऱ्या प्रश्नांनी घेतलेले भयनाक स्वरूप आणि या साऱ्यांतूनही आशेचा किरण दिसू शकतो, ही भावना यातून व्यक्त होते. परदेशातील कायदा-सुव्यवस्था, ‘इथे-तिथे’ मधला जाणवणारा फरक, तिथल्या चांगल्या-वाईट, आदर्श गोष्टी, दाखले किरण बेदी देतात. स्वत: उत्तम खेळाडू असल्याने खेळ-आरोग्याची महती त्या गातात. काही निवडक लोकांची पत्रे दाखवत त्यावर भाष्य करतात. कधी एखाद्या ठिकाणी आपण केलेले भाषणच ओघवते लिहून जातात. या साऱ्यांतून त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व जाणवून जाते. ‘‘मी जे पाहते, ऐकते, वाचते, बारकाईने निरखते त्याचे काय करावे असा प्रश्न मला पडतो. मी ते सर्व विसरून जाऊ शकते, दुर्लक्षू शकते. त्याबद्दल तक्रारी करू शकते वा पुढे बघू म्हणून हात झटकू शकते. पण तसे न करता त्यावर लिहून शब्दांतून माझी अस्वस्थता प्रकट करणे ही मला माझी एक गरज वाटते. म्हणून मी लिहिते आणि लिहित राहीन.’’ या किरण बेदींच्या उद्गारातून त्यांची भूमिका सहज स्पष्ट होऊ शकते. यथार्थ शीर्षके आणि रोखठोक कथन असलेले हे अनुभव बेदींची चीड, प्रेरणा, चित्तवेधक गोष्टी, वैचारिकता असे कंगोरे दाखवतात. समाज वास्तवाच्या असंख्या छटा रंगवून त्यांचे दर्शन वाचकांना घडवायचा त्यांचा मानस आहे. ओघवती भाषा, सुबोध आणि नेमका आशय थोडक्या शब्दांत पोचवणारी शैली बेदींनी आत्मसात केलेली दिसते. वाचकांशी संवाद साधत, सजग करत, त्यांना ‘माणूस’ बनवण्याचे बेदींचे प्रयत्न प्रामाणिक वाटतात. समाज सर्वार्थाने सुंदर व्हावा, असे किरण बेदींना वाटते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाने झटायला हवे. म्हणूनच ‘अ‍ॅज आय सी...’ असे म्हणताना तुम्हीही पाहा, असे मन:पूर्वक त्या वाचकांना सांगतात. 
आपल्या स्पष्ट आणि निडर स्वभावाला अनुसरून डॉ. किरण बेदी अनुभवाला आलेल्या अनेक आक्षेपार्ह बाबींवर, भावलेल्या विषयांवर कळकळीने लिहीत असतात. साध्या अनलंकृत शैलीतील हे लेखन सामाजिक अन् नैतिक विषयावरील त्यांची मते मांडत असते. या विषयांवर जनतेने जागृत होऊन विचार करावा, सजग व्हावे आणि एकत्र होऊन कृतिशील व्हावे हा हेतू मनात धरून त्या लिहीत असतात. देशातील सर्वसामान्यांना माहीत असलेल्या, नसलेल्या समस्यांवर लिहिलेले वाचताना, वाचकांना डॉ. किरण बेदींची एक संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख होते. त्यांचे लिखाण वाचकांना सरकार, प्रशासन याबद्दल विचारप्रवृत्त करते.
अ‍ॅज आय सी’ (नेतृत्व आणि प्रशासन) यामध्ये देशाची सुरक्षा यासारखी महत्त्वाची गोष्ट अजूनही सर्वार्थाने परिपूर्ण नाही. त्यासाठी घ्यावे लागणारे संघटनात्मक प्रयत्न याबद्दल चर्चा आहे. वृद्धत्त्वांबद्दल अजूनही समाजात असलेली अनास्था आणि सरकारची उदासिनता याव त्यांचे भाष्य डोळ्यात अंजन घालणारे ठरते. किरण बेदींच्या मते ‘माहितीचा अधिकार’ हे महत्त्वाचे शस्त्र सामान्य जनतेला मिळालं आहे. ते योग्य ठिकाणी वापरल्यास त्याचा समाजाला खूप फायदा मिळेल हे त्यांनी सुचवलं आहे. सार्वजनिक स्वच्छता हा तर वादाचा विषय होईल. नागरिकांनी या बाबतीत जबाबदारीने वागलं पाहिजे. नवीन पिढीने आता उशीर करायला नकोय. आशावादी राहा. स्वतःला बदला. उद्याचा भारत नक्की बदललेला असेल ही खात्रीही तुम्हा आम्हाला दिली आहे. प्रशासनाच्या चांगल्या-वाईट दोन्ही कार्यपद्धतीवर त्यांनी टिप्पणी केली असून जनमानसात प्रतिमा उंचावण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील असावे, ही अपेक्षा व्यक्त केली आहे. एकूण काय ‘अ‍ॅज आय सी’ वाचताना आपण भारतीय आहोत ही जाणीव प्रकर्षाने जाणवते.



"अ‍ॅज आय सी’ - नेतृत्व आणि प्रशासन
लेखक : डॉ. किरण बेदी
पुस्तकाची पाने : 248
किंमत : रु 240.00




सौ. मनिषा राजन कडव
१६/ए ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरूनानक शाळेजवळ , रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.