शुक्र चांदणी
सदर *पुस्तके उलगडताना* करिता शुक्र चांदणी ठसठशीत नायिका आणि त्यांच्या जीवनातील मूल्यसंघर्ष चितारणाऱ्या चित्तरकथा... माधवी देसाई यांच्या अकरा कथांचा समावेश शुक्रचांदणी या पुस्तकात करण्यात आला आहे. हा त्यांचा सहावा कथासंग्रह. ठसठशीत नायिकांच्या व्यक्तिरेखा हे कथांचे वैशिष्ट्य. अधांतर या कथेची नायिका आहे एक महिला पोलीस इन्स्पेक्टर. नीलांबरी. अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यातील हवालदार रावराणे यांची एकुलती एक कन्या नीलांबरी. वडिलांप्रमाणेच थोराड, धिप्पाड, काळीसावळी. ती बी.ए. झाल्यावर पोलीस इन्स्पेक्टर होण्याचे ठरवते. प्रशिक्षण काळात खाकी युनिफॉर्म आणि इतरांवर अधिकार गाजवण्याची ईर्षा यांचा संचार जणू तिच्या अंगात होतो. डिस्टिंक्शन घेऊन ती ग्रुपमध्ये पहिली येते. हवालदार बापाला अस्मान ठेंगणे होते. ठाणे जिल्ह्यातील एका महिला पोलीस स्टेशनवर तिची नेमणूक होते. हाताखालच्या अधिकाऱ्यांवर जरब बसवते. गुन्हेगारांना ती कर्दनकाळ वाटते. त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवून काढायचे काम मात्र ती असिस्टंटवर सोपवते. लग्नाचा बेत ती लांबणीवर टाकत राहते. तिचे वडील घोकत राहतात.``लेकीचं लगीन? च...