*तुझी आठवण येते!* तुझी आठवण येते! हे हळवेपण; कळते,सलते, तरी ओघळते, पानावरुनी अलगद दंव कण! तुझी आठवण येते! ही हतबलता; छळते, गिळते, उरी गलबलते, कातर वेळा मनांत भरता! तुझी आठवण येते! हे आधारीत जगणे; रुतते, खुपते, मनात सलते, नजरेत आपुल्या मरणे! तुझी आठवण येते! ऋण जन्माचे; जपते, फिटते, तरीही उरते बंधन, भाव मनाचे! तुझी आठवण येते! स्निग्ध दिलासा देते, भरते, रित्या मनाते विश्वास हवा हवासा! सौ.मनिषा राजन कडव